खड्ड्यांनी संगमेश्वर–देवरुख मार्गाची दैना; अर्ध्या तासाचा प्रवास तासाभरावर

Gramin Varta
47 Views

देवरुख : संगमेश्वर–देवरुख–साडवली या राज्य मार्गावरील संगमेश्वर ते देवरुख दरम्यानचा रस्ता पुन्हा एकदा मोठमोठ्या खड्ड्यांनी विद्रूप झाला असून वाहनचालक आणि प्रवाशांचा प्रवास अक्षरशः जीवघेणा बनला आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून, पूर्वी अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होणारा प्रवास आता तब्बल एका तासापर्यंत लांबत आहे.

या मार्गावरील डांबरीकरण उखडून निघाल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांचे नुकसान, वाढलेला प्रवासाचा वेळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे ती दुरुस्ती अल्पावधीतच उखडून निघाली आणि रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे केलेल्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या मार्गाचा वापर दररोज हजारो नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिका करतात. खराब रस्त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेकांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. पावसाळा संपेपर्यंत तात्पुरत्या मलमपट्टीवर अवलंबून न राहता या मार्गासाठी ठोस उपाययोजना करण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4585025
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *