रत्नागिरी / अजय सावंत : गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कोकणात गणेशोत्सवाची लगबग वेगाने सुरू झाली आहे. घराघरांत उत्सवाच्या तयारीला वेग आला असून, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशमूर्तींच्या कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची दिवस-रात्र धावपळ सुरू असून, गावागावांत बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा घरगुती गणेशमूर्तींची संख्या १ लाख ६९ हजार ५३८ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात १२६ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यामुळे घरगुती आणि सार्वजनिक अशा एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तींची यंदा प्रतिष्ठापना होणार आहे.
कोकणातील गणेशोत्सव हा चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही विशेष ओळखला जातो. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांत नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी परततात. त्यांच्या आगमनामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील गावागावांत पुन्हा चैतन्य निर्माण होते. त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवासाचीही तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी जादा रेल्वे गाड्या आणि एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील खासगी बससेवांसह परजिल्हे आणि परराज्यांतूनही अनेक खासगी बसेस चाकरमान्यांना घेऊन कोकणात दाखल होणार आहेत. त्यामुळे उत्सवाच्या काळात कोकणातील प्रमुख मार्गांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने कोकणाकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल माफी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांच्या बैठकांनाही सुरुवात झाली आहे. उत्सव काळात वाहतूक सुरळीत ठेवणे, प्रवाशांची गैरसोय टाळणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि विविध शासकीय विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याबाबत नियोजन केले जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध विभागांनी प्रभावीपणे कामकाज कसे राबवावे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जात आहेत.
एका बाजूला गणेशमूर्तींच्या कार्यशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तींना अंतिम रूप दिले जात आहे, तर दुसरीकडे चाकरमानी गावाकडे परतण्यासाठी प्रवासाचे नियोजन करत आहेत. रेल्वे, एसटी, खासगी बसेस तसेच खासगी वाहनांची संख्या वाढल्याने कोकणातील रस्त्यांवरही मोठी वर्दळ निर्माण होणार आहे.
त्यामुळे ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाच्या स्वागतासाठी अवघा कोकण सज्ज होत असून, गणेशोत्सवाची धामधूम आता शिगेला पोहोचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती गणपती; १२६ सार्वजनिक मंडळांतही गणराय विराजमान होणार
Leave a Comment






