पूजा साहित्याला महागाईची झळ, तरीही भाविकांचा खरेदीकडे ओढा

Gramin Varta
56 Views

रत्नागिरी : गणेशोत्सवाची चाहूल लागताच शहरातील बाजारपेठांमध्ये पूजासाहित्याच्या खरेदीसाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची दुकाने विविध वस्तूंनी सजली आहेत. मात्र, इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक खर्चावर झाल्याने पूजेसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. दरवाढीची झळ बसत असली तरी गणेशभक्तांच्या उत्साहावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

गणेशोत्सवासाठी कापूर, धूप, अगरबत्ती, कापूस, हळदी-कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी, लाल कापड, जानवे, अक्षता, अंतर, फुले तसेच विविध पूजाविधींचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. घरगुती गणपतींसोबतच सार्वजनिक मंडळांकडूनही पूजासाहित्याची मागणी वाढल्याने बाजारात उलाढाल वाढली आहे.

यंदा पूजासाहित्यातील काही वस्तूंच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः कापूस, कापूर, धूप आणि अगरबत्तीच्या दरात वाढ जाणवत आहे. वाहतूक व इंधन खर्च वाढल्यामुळे मालाच्या किमतीवर त्याचा थेट परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवात अगरबत्ती आणि कापूर यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारात विविध प्रकारच्या अगरबत्त्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कमी किमतीपासून सुगंधी व उच्च दर्जाच्या अगरबत्त्यांपर्यंत विविध पर्याय ग्राहकांना मिळत आहेत. गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी भाविकांची बाजारपेठेत गर्दी होत असून, उत्सव जसजसा जवळ येईल तसतशी खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Total Visitors :
4819435
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *