श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सिनेट सदस्यांशी थेट संवाद

Gramin Varta
87 Views

नवीन परीक्षा पद्धती, निकालांचा विलंब आणि ‘Absent-Held’च्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी मांडले प्रश्न

लांजा/अरबाज नेवरेकर:मुंबई विद्यापीठाच्या नवीन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच निकाल जाहीर होण्यास होणाऱ्या विलंबाबाबत लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सिनेट सदस्यांशी थेट संवाद झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी अंतर्गत परीक्षा, क्रेडिट प्रणाली, निकालातील तांत्रिक त्रुटी, ‘Absent’ व ‘Held’ दाखविण्याचे प्रकार आणि निकालाच्या विलंबामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत प्रश्न उपस्थित केले.

या संवादावेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, सचिव महेश सप्रे, प्राचार्य देऊसकर, तालुका प्रमुख युवराज हांदे, युवासेना तालुकाप्रमुख अभि राजेशिर्के, बाबा धावणे, सुजित भुर्के आणि आदित्य कामत उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य मिलिंद साठम, डॉ. धनराज कोहचाडे, अ‍ॅड. अल्पेश भोईर, स्नेहा गवळी, मयूर पांचाळ तसेच युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रद्युमन माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत लागू झालेल्या नवीन परीक्षा पद्धतीमध्ये वारंवार होणाऱ्या अंतर्गत परीक्षा आणि क्रेडिट प्रणालीमुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावर नवीन पद्धतीशी जुळवून घेताना सुरुवातीला काही अडचणी येत असल्या तरी अंतर्गत मूल्यमापन अधिक सुलभ व विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेत चर्चा सुरू असल्याचे मिलिंद साठम यांनी स्पष्ट केले.

निकालांच्या विलंबाचा मुद्दा विद्यार्थ्यांनी विशेषत्वाने उपस्थित केला. परीक्षा झाल्यानंतर अनेक महिने निकाल न लागल्याने पुढील प्रवेश, उच्च शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणले. उत्तरपत्रिका तपासणीतील विलंब आणि तांत्रिक अडचणींमुळे काही निकाल रखडत असल्याचे डॉ. धनराज कोहचाडे यांनी सांगितले. ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यात येत असून, निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयात परीक्षा देऊनही निकालात ‘Absent’ दाखविणे किंवा काही विषयांचे निकाल ‘Held’ ठेवले जाण्याच्या प्रकाराबाबतही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. डेटा एंट्री व तांत्रिक त्रुटींमुळे अशा समस्या निर्माण होतात. विद्यार्थ्यांना प्रत्येक तक्रारीसाठी मुंबईला जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर तक्रार निवारण व्यवस्था सक्षम करण्याबाबत उपाययोजना करण्यात येत असल्याचे अ‍ॅड. अल्पेश भोईर यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या बदललेल्या नियमांची आणि परीक्षा पद्धतीची माहिती वेळेत मिळावी, यासाठी महाविद्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुप, डिजिटल नोटीस बोर्ड आदी माध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रद्युमन माने व मयूर पांचाळ यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित परीक्षा व निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करून निकाल वेळेत लागावेत, यासाठी विद्यापीठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मिलिंद साठम यांनी दिले. या संवादामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्या थेट सिनेट सदस्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली.

Total Visitors :
4819865
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *