खापणे महाविद्यालयात रंगले ‘श्रावणधारा’ काव्यसंमेलन

Gramin Varta
66 Views

काव्यसरींत चिंब झाली तरुणाई; निर्मिती जाधव प्रथम, सिद्धी चव्हाण द्वितीय तर तुलसी वरेकर तृतीय

राजापूर (तुषार पाचलकर) : येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात मराठी भाषा व वाङ्मय मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग शाखा, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणधारा’ या निमंत्रित कवींच्या काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. श्रावण, पाऊस, निसर्ग आणि भावविश्वाला शब्दरूप देणाऱ्या विविधांगी कवितांच्या सादरीकरणाने महाविद्यालयाचा सभागृह काव्यरसिकांच्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. विशेषतः विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संमेलनाला तरुणाईचा उत्साह लाभला.

दीपप्रज्वलन तसेच कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून काव्यसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण कोकण युवाशक्तीचे प्रमुख अरुण मोर्ये होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश सकपाळ, संस्था सदस्य चंद्रकांत लिंगायत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, डॉ. ए. डी. पाटील, मराठी भाषा व वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. बी. टी. दाभाडे, ज्येष्ठ कवी व चित्रकार हेमंत लब्दे, नितीश खानविलकर, नागेश साळवी, प्रमोद जाधव, मानसी सुर्वे, स्नेहल चव्हाण, श्रुती फुटक, मालवी होरंबे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर, नारकर वाचनालयाचे कार्यवाह विनायक खानविलकर, ग्रंथपाल विठोबा चव्हाण, कमलाकर धुल आदी साहित्यिक, कवी व मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातून डॉ. बी. टी. दाभाडे यांनी काव्यसंमेलनामागील भूमिका व कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. प्रकाश सकपाळ आणि नरेश पाचलकर यांनी मनोगतातून काव्यसंमेलनास शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन सत्रानंतर विद्यार्थ्यांच्या काव्यसादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. साहिल नार्वेकर, निर्मिती जाधव, सारिका गुरव, सिद्धी चव्हाण, राज व्हावळे, रितेश पवार, अनुजा गुरव, तुलसी वरेकर, संस्कार नारकर आणि श्रुती कलमष्टे यांनी आपल्या कविता सादर केल्या. या स्पर्धेत निर्मिती जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर सिद्धी चव्हाण हिने द्वितीय आणि तुलसी वरेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यानंतर ज्येष्ठ कवी हेमंत लब्दे, नरेश पाचलकर, अरुण मोर्ये, डॉ. विकास पाटील, नितीश खानविलकर, नागेश साळवी, प्रमोद जाधव, मानसी सुर्वे, स्नेहल चव्हाण, श्रुती फुटक आणि मालवी होरंबे यांनी श्रावण व पावसाच्या विविध छटा आपल्या कवितांमधून उलगडल्या. निसर्ग, पाऊस, आठवणी, भावना आणि मानवी जीवनाशी जोडलेल्या आशयपूर्ण कवितांनी उपस्थित काव्यरसिकांची दाद मिळवली. सहभागी सर्व कवींचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला.

काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. विकास पाटील यांनी केले, तर नितीश खानविलकर यांनी आभार मानले. परिसरातील काव्यरसिकांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना साहित्य आणि काव्याच्या विश्वाशी जोडणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालयीन वातावरणात साहित्यिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Total Visitors :
4820380
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *