पाचल ग्रामपंचायतीकडून ३०० हून अधिक दिव्यांग व गरजू नागरिकांना साहित्य वाटप

Gramin Varta
3 Views

आमदार किरण सामंत यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा विशेष सत्कार

राजापूर : स्मार्ट ग्रामपंचायत पाचलच्या वतीने १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग तसेच गरजू नागरिकांसाठी विविध आवश्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पाचल ग्रामपंचायत इमारतीतील सभागृहात उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील ३०० हून अधिक दिव्यांग व गरजू नागरिकांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार किरण उर्फ भैया सामंत, पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, राजापूर पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर, प्रसाद मोहोरकर, राजू कुरूप, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर, पांगरीचे सरपंच अमर जाधव, पाचलचे माजी सरपंच अशोक सक्रे, पाचल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक खानविलकर तसेच प्रभाग संघाच्या अध्यक्षा विनया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राजापूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेबद्दल राजापूर तालुका पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा पाचल ग्रामपंचायतीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, राजापूर शहरानंतर पाचल ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली ग्रामपंचायत आहे. त्यामुळे पाचलच्या विकासासाठी विविध नागरी सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध होतो. यापूर्वीही आपल्या माध्यमातून ग्रामपंचायतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, भविष्यातही विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दिव्यांग नागरिकांसाठी साहित्य वाटपाचा हा अत्यंत सुंदर आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या हस्ते साहित्य वाटप होत असल्याचा आपल्याला आनंद आणि अभिमान असल्याचेही आमदार सामंत यांनी सांगितले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच बाबालाल फरास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग व गरजू नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना मोठा आधार मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच बाबालाल फरास यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सिद्धार्थ जाधव यांनी केले.

Total Visitors :
4770853
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *