पळसमकर वाडीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठा दिलासा; वनविभागाच्या तत्परतेबद्दल आभार
राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील वडद हसोळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या माकडांच्या उपद्रवावर अखेर वनविभागाने कारवाई केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वनविभागाने मोहीम राबवून ६ माकडांना सुरक्षितपणे जेरबंद केले. या कारवाईमुळे वडद हसोळ व पळसमकर वाडीतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
वडदहसोळ आणि आसपासच्या परिसरात माकडांच्या टोळ्यांमुळे बागायती पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. नागरी वस्तीतही माकडांचा शिरकाव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येकडे मनसे, वडद हसोळ शाखेच्या वतीने राजापूर वनविभागाचे लक्ष वेधण्यात आले. मनसे पदाधिकाऱ्यांनी वन अधिकारी श्री. बावधने यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती देत तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली.
निवेदनाचे गांभीर्य ओळखून अधिकारी बावधने यांनी वन अधिकारी श्री. निलेश गुरव व त्यांच्या पथकाला वडद हसोळ येथील पळसमकर वाडी येथे रवाना केले. वनविभागाच्या पथकाने परिसरात पिंजरा लावून नियोजनबद्ध मोहीम राबवली. या मोहिमेत ६ माकडे पिंजऱ्यात अडकली. जेरबंद केलेल्या सर्व माकडांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
वनविभागाने दाखवलेली तत्परता आणि मनसेच्या पुढाकारामुळे माकडांच्या उपद्रवापासून तात्पुरती मुक्ती मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून वनविभागाचे आभार मानले आहेत.




