राजापूर तालुक्यातील वाहनचालकांना टोलमाफी द्या; अन्यथा टोलनाका बंद पाडू : अरविंद लांजेकर

Gramin Varta
150 Views

तुषार पाचलकर/राजापूर : राजापूर तालुक्यातील हातिवले येथे मुंबई-गोवा महामार्गावर उभारण्यात आलेला टोलनाका पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला असून, पुढील महिन्याच्या अखेरीस हा टोलनाका सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, टोलनाका सुरू होण्यापूर्वीच स्थानिक वाहनचालकांना संपूर्ण टोलमाफी देण्याच्या मागणीवरून वातावरण तापू लागले आहे. राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिक तसेच वाहतूकदारांना टोलमाफी देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून टोलनाका बंद पाडू, असा इशारा कोंढेतडचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.

हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. याच मागणीसाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी स्थानिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर हातिवले टोलनाका अद्याप कार्यान्वित झालेला नाही. तसेच स्थानिक वाहनचालकांच्या टोलमाफीबाबतही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील महामार्गावरील टोलनाका सुरू झाल्याने हातिवले टोलनाका सुरू करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.

राजापूर शहर व तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा करावी लागते. अनेक नागरिकांना दिवसातून चार-पाच वेळा शहरात किंवा इतर ठिकाणी प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी टोल भरावा लागल्यास स्थानिक वाहनचालकांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. विशेषतः स्थानिक वाहतूकदारांना नियमितपणे या मार्गाचा वापर करावा लागत असल्याने त्यांच्यावरही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.

हातिवले टोलनाक्यावरून स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहणार असल्याने राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिक आणि वाहतूकदारांना संपूर्ण टोलमाफी देणे आवश्यक आहे, अशी भूमिका लांजेकर यांनी मांडली. याबाबत स्थानिक वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदनेही देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसताना टोलनाका सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने टोलमाफीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

स्थानिकांच्या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून हातिवले टोलनाका सुरू करण्यापूर्वी राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिक व वाहतूकदारांना संपूर्ण टोलमाफी द्यावी. अन्यथा, टोलनाका सुरू होताच त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रसंगी टोलनाका बंद पाडण्यासाठी आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा अरविंद लांजेकर यांनी दिला आहे. त्यामुळे हातिवले टोलनाका सुरू होण्यापूर्वीच टोलमाफीचा मुद्दा चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Total Visitors :
4724699
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *