मुंबई: महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलेला ‘होम मिनिस्टर’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आयुष्यात आनंद आणि आत्मविश्वास घेऊन आलेला प्रवास आहे.
तब्बल २० वर्षं दररोज प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाने एक वेगळीच ओळख निर्माण केली. आता ‘होम मिनिस्टर’ पुन्हा एकदा नव्या रूपात आणि नव्या विचारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या २० वर्षांच्या प्रवासात ‘होम मिनिस्टर’ने महाराष्ट्राच्या न्हवे तर भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला. आदेश बांदेकर यांनी असंख्य घरांना भेटी दिल्या. विविध शहरं, गावं आणि कुटुंबांपर्यंत पोहोचताना जवळपास २५ लाख किलोमीटरचा प्रवास या कार्यक्रमाने केला. या प्रवासात अनेक कुटुंबांच्या खास आठवणी कार्यक्रमाचा भाग बनल्या. बहिणी पुन्हा एकमेकींना भेटल्या. विभक्त कुटुंबांमध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक घराची वेगळी गोष्ट आणि प्रत्येक ‘वहिनी’चा वेगळा संघर्ष ‘होम मिनिस्टर’ने जवळून अनुभवला.
या २० वर्षांच्या काळात ‘वहिनींना’ सुमारे ७,५०० पैठण्या भेट म्हणून मिळाल्या. पैठणीला ‘महाराष्ट्राचा महासन्मान’ आणि ‘महाराष्ट्राची अस्मिता’ अशी ओळख मिळवून देण्यात ‘होम मिनिस्टर’चा मोठा वाटा राहिला. प्रत्येक वहिनीच्या कपाटात पैठणी असेलच असं नाही, पण स्वतःच्या मेहनतीने, खेळ जिंकून मिळवलेली पैठणी ही तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली. ‘महामिनिस्टर’ या विशेष पर्वात तर अंतिम विजेत्या वहिनीला तब्बल ११ लाख रुपयांची पैठणी देण्यात आली. या प्रवासाचा साधारण २० ते २५ हजार महिलांच्या आयुष्यात या कार्यक्रमाने आनंदाचे क्षण आणले. होम मिनिस्टरने आदेश बांदेकरांना महाराष्ट्राचा ‘भाऊजी’ अशी ओळख दिली. आदेश बांदेकर आणि ‘होम मिनिस्टर’चं प्रत्येक घराशी जुळलेलं नातं आजही तितकंच खास आहे.
आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणतात, “होम मिनिस्टरच्या या प्रवासात महाराष्ट्राच्या असंख्य घरांमध्ये जाण्याची, तिथल्या वहिनींना भेटण्याची आणि त्यांच्या आयुष्यातले खास क्षण अनुभवण्याची संधी मला मिळाली. हा प्रवास माझ्यासाठी फक्त कार्यक्रमाचा प्रवास नव्हता, तर तो माणसांचा आणि नात्यांचा प्रवास होता. प्रत्येक वहिनीची आपली एक गोष्ट होती, तिचं एक स्वप्न होतं. त्या घरांमध्ये जाणं, त्यांच्या कुटुंबाला भेटणं आणि त्यांच्या सुख दुःखाचा भाग होणं मला खूप आवडायचं. गेली २ वर्ष मी हे सगळं खूप मिस केलं. या कार्यक्रमाला मी खूप मिस केलं. पुन्हा एकदा त्यांच्या घरी जाण्याची, त्यांच्या आयुष्यातला आनंद जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे, याचा मला खूप आनंद आहे.’होम मिनिस्टर’च्या पुनरागमनाची घोषणा होताच पहिल्याच आठवड्यात १५ हजारांहून अधिक प्रवेशिका मिळाल्या. या प्रतिसादातून कार्यक्रमाशी जोडलेलं प्रेक्षकांचं नातं पुन्हा एकदा दिसून आलं. एका महिलेने ‘होम मिनिस्टर’ची अतिशय सुंदर व्याख्या करताना म्हटलं, “होम मिनिस्टर म्हणजे सर्वसामान्य स्त्रीला आत्मविश्वास देणारा कार्यक्रम.”
याच विचाराला नव्या पर्वात आणखी मोठं रूप मिळणार आहे. यावेळी केवळ घर सांभाळणाऱ्या स्त्रीचा नाही, तर घर आणि संसार सांभाळताना स्वतःच्या कर्तृत्वाची नवी वाट तयार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान होणार आहे. मग ती गृह उद्योजिगिक असो, नोकरीसाठी रोज घराबाहेर पडणारी स्त्री असो, कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या किंवा सासूच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी स्त्री असो, तिच्या कष्टांचा, विचारांचा आणि योगदानाचा सन्मान या नव्या पर्वात होणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’ ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. त्या स्त्रीच्या कर्तृत्वाचा, तिच्या मेहनतीचा आणि तिच्या स्वप्नांचा गौरव करणं हीच ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची खासियत असणार आहे.
घरासाठी जगताना स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या या सर्वसामान्य स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘होम मिनिस्टर’ पुन्हा सज्ज झाला आहे. यावेळी घरासाठी उंबरठा ओलांडायचा ठरलय पाऊल पूढे पडलय!
‘होम मिनिस्टर’ पुन्हा सज्ज; पहिल्याच आठवड्यात १५ हजारांहून अधिक प्रवेशिका
Leave a Comment






