उदय दणदणे/ मुंबई: कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, शाखा तालुका गुहागर आणि गुहागर तालुका कुणबी सहकारी पतपेढी लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी कित्ते भंडारी हॉल, गोखले रोड, दादर, मुंबई येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ज्येष्ठ समाजसेवक आणि यशस्वी उद्योजकांचा सन्मान सोहळा शाखाध्यक्ष अनंत मालप यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शक, मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
सदर सोहळ्यात गुहागर तालुक्याच्या दक्षिण भागातील असोरे गावाने पुन्हा एकदा कर्तृत्वाचा झेंडा फडकवला असून कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने मुंबई येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात असोरे गावचे सुपुत्र तसेच प्रशांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स’चे प्रमुख प्रशांत सुरेश आग्रे यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले. गुहागर तालुक्यातील आबलोली, आवरे, पाचेरी, शिवणे, खोडदे, काजूर्ली, भातगाव या पंचक्रोशीत वसलेल्या असोरे गावाने नेहमीच कर्तृत्ववान सुपुत्र दिले आहेत. याच भूमीतून कै. सुरेशशेठ बाळू आग्रे यांनी सन २००२ मध्ये प्रशांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स या प्रवासी बससेवेची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हा संपूर्ण पंचक्रोशीसाठी हा अभिमानाचा क्षण होता. वारसा फक्त जपायचा नसतो, तो कर्तृत्वाने अधिक उंचीवर नेणारा असतो या उक्तीनुसार दुर्दैवाने २०१७ मध्ये कै. सुरेशशेठ यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर ज्येष्ठ चिरंजीव सुशांत आग्रे यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली, तर साधारण २५ व्या वर्षी धाकटे चिरंजीव प्रशांत आग्रे यांनी व्यवसायाची सर्व जबाबदारी खांद्यावर घेतली.
प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता, मेहनत, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी वडिलांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज भक्कम वटवृक्षात रूपांतर केले. गेल्या २०-२५ वर्षांपासून प्रशांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही पंचक्रोशी, गुहागर तालुका आणि मुंबई दरम्यान प्रवाशांसाठी विश्वासार्ह नाव बनली आहे. आपुलकीची सेवा आणि पारदर्शक कारभारामुळे आग्रे कुटुंबाने कुणबी समाजात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संघाच्या वतीने प्रशांतशेठ यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रशांतशेठ भावूक झाले व ते म्हणाले की, समाजाच्या पाठिंब्यामुळे आणि आशीर्वादामुळेच आज आपण या स्थानावर पोहोचू शकलो असून हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण असोरे गावाचा आणि पंचक्रोशीचा आहे.
यावेळी कुणबीवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष दिनेश डिंगणकर म्हणाले की, वडिलांच्या कष्टाने उभारलेल्या व्यवसायाला प्रशांत यांनी नव्या उंचीवर नेले असून त्यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मंडळाचे माजी सचिव दिपक वेलुंडे यांनीही आग्रे बंधूंच्या जिद्दीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उपस्थित समाजबांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रशांतशेठ यांचे अभिनंदन केले. एकूणच, प्रशांत आग्रे यांचा हा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नसून, कष्ट, निष्ठा आणि वारसा जपण्याच्या भावनेचा सन्मान आहे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक राजेश वि. शंखे भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार विजेते तसेच संघ सरचिटणीस कृष्णा वणे, सहचिटणीस माधव कांबळे यांच्या सह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होती.






