मंडणगड : म्हाप्रळ–आंबेत पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाडचे कार्यकारी अभियंता यांनी ११ ऑगस्ट रोजी रायगड व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आंबेत पुलावरून वाहतूक सुरू करण्यास विभागाची हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
म्हाप्रळ–आंबेत पूल हा सावित्री खाडीवरील महत्त्वाचा दुवा असून, जुलै महिन्यात बार्ज धडकल्याने झालेल्या अपघातानंतर पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यापूर्वी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. म्हाप्रळ-आंबेत पुरारामार्गावरील कि.मी. ०/१०० मधील आंबेत पुलाला सावित्री खाडीत दोन मोठ्या बार्जची धडक लागल्याने पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यानंतर दि. १२ जुलैपासून कार्यकारी अभियंता, रायगड संकल्पचित्र मंडळ, कोकण भवन यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संदेशानुसार सदर पुलावरून दुचाकी व हलकी चारचाकी वाहने पूर्ण नियंत्रणामध्ये सोडण्यात आली होती.
दरम्यान, प्लॅनिस टेक्नॉलॉजी प्रा. लि., चेन्नई या संस्थेने पुलाच्या पाण्याखालील भागाचे स्ट्रक्चरल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला. या अहवालानुसार आंबेत पुलावरून कमाल २० मेट्रिक टन वजनापर्यंतची वाहने तसेच ताशी २० किलोमीटर वेगमर्यादेत सर्व प्रकारची वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची हरकत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे आंबेत पुलावरून मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुलाची सुरक्षितता कायम राखण्यासाठी निर्धारित २० टन वजनमर्यादा आणि ताशी २० किमी वेगमर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहणार असून, संबंधित प्रशासकीय व पोलीस यंत्रणांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.




