चिपळूण : SBI YONO अधिकारी असल्याचे भासवून ८६ वर्षीय निवृत्ताची ५.२६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Gramin Varta
127 Views

चिपळूण : SBI YONO अॅपच्या कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून एका ८६ वर्षीय निवृत्त व्यक्तीची तब्बल ५ लाख २६ हजार २७९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली आणि त्यानंतर मोबाईल हॅक करून खात्यातून परस्पर रक्कम वळती केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चिपळूण शहरातील महालक्ष्मी नगर परिसरात राहणारे कविश्वर कृष्णाजी बापट (वय ८६) हे सेवानिवृत्त असून, त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला. आपण SBI YONO अॅपच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून संबंधित व्यक्तीने बापट यांच्याकडून विविध माहिती मिळवली. तसेच त्यांच्या सेव्हिंग बँक खात्याशी संबंधित माहितीही विचारून घेतली.

त्यानंतर अज्ञात व्यक्तीने बापट यांचा मोबाईल हॅक केल्याचा आरोप असून, मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या SBI सेव्हिंग खात्यातून एकूण ५,२६,२७९ रुपये परस्पर ऑनलाइन व्यवहाराद्वारे काढून घेतले. आपल्या खात्यातून रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर बापट यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.१४ वाजता चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक २३७/२०२६ असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ड) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमुळे ऑनलाइन बँकिंग करताना नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना बँक खाते, OTP, पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Total Visitors :
4693420
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *