मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे 3 दिवसात जैसे थे;सावर्डे परिसरात अपघातांचा धोका वाढला

Gramin Varta
59 Views

सावर्डे (विनायक सावंत) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडून खड्डे निर्माण झाले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित अधिकारी व महामार्गाच्या ठेकेदाराकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड महिन्यात या ठिकाणी दोन वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र, खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या काही दिवसांत रस्ता पुन्हा पूर्ववत खराब झाला. सध्या काँक्रीट व इतर साहित्य टाकून आरती स्वीट समोरील भरलेले खड्डे केवळ तीन दिवसांतच उखडून निघाल्याचे चित्र दिसत आहे.
पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्यावरील खोल भेगा आणि उखडलेला भाग यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. अशा परिस्थितीत सावर्डे येथील धोकादायक खड्ड्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.

“खड्डे बुजविण्याची केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Total Visitors :
4671916
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *