उपचारांचा तपशील समजून न घेता, डॉक्टरांशी न बोलता बदनामी करणाऱ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार : प्रशासन
चिपळूण : अपरांत हॉस्पिटलमध्ये एका अत्यवस्थ वृद्ध रुग्णावरील उपचार आणि त्यानंतरच्या बिलाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रुग्णाचा जीव वाचवणे हेच डॉक्टरांचे पहिले कर्तव्य असून, उपचारांमध्ये कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक ती सर्व वैद्यकीय प्रक्रिया तातडीने करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ७० वर्षीय वृद्धाला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन नातेवाईकांच्या संमतीने तातडीने उपचार सुरू करण्यात आले. हृदयविकाराच्या गंभीर रुग्णासाठी अत्यावश्यक असलेले Abbott कंपनीचे Inj. TENECTELEX 40 हे रक्त पातळ करणारे इंजेक्शन देण्यात आले. रुग्णाच्या स्थितीनुसार दोन इंजेक्शन्स द्यावी लागली असून, त्यांची किंमत सुमारे ₹१.०८ लाख इतकी होती.
रुग्णावर पुढील ३६ तास अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. औषधे, तपासण्या आणि उपचारांसह एकूण बिल सुमारे ₹१.४७ लाख झाले. मात्र, यामध्ये हॉस्पिटलचे प्रत्यक्ष सेवा शुल्क केवळ ₹२० ते २२ हजार रुपये असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले की, गंभीर रुग्ण दाखल झाल्यानंतर डिपॉझिट किंवा पैशांची मागणी करण्यात आली नव्हती. उपचार सुरू करण्यासाठी एकही रुपया आगाऊ घेतला गेला नाही. रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील अँजिओप्लास्टीसाठी त्यांना डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. बिलाची रक्कम न भरताही रुग्णाला रेफर करण्यात आल्याचेही हॉस्पिटलने नमूद केले.
या प्रकरणात उपचारांचा तपशील समजून न घेता डॉक्टर आणि हॉस्पिटलवर संशय घेतल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाले असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. भविष्यात गंभीर रुग्ण आल्यावर तातडीने उपचार सुरू करावेत की आधी खर्चाची माहिती देऊन निर्णयाची वाट पाहावी, असा प्रश्न आता डॉक्टरांसमोर निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
याचबरोबर, घटनेची वस्तुस्थिती जाणून न घेता, संबंधित डॉक्टर किंवा हॉस्पिटल प्रशासनाची बाजू न ऐकता सोशल मीडियावरून हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, अशा संबंधितांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही अपरांत हॉस्पिटल प्रशासनाने दिला आहे.
हॉस्पिटलने शेवटी प्रश्न उपस्थित केला आहे की, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तत्काळ उपचार करणे हे चूक होते का? तसेच उपचारांपूर्वी पैसे न मागता सेवा देण्याच्या भूमिकेमुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झाल्याची खंतही व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटलची भूमिका स्पष्ट; ‘रुग्णाचा जीव वाचवणे हेच पहिले कर्तव्य’
Leave a Comment





