नाशिक : अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहित महिलेवर तब्बल चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिच्याकडून ७८ लाखांची उकळपट्टी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने कोरे धनादेश घेऊन बँक खात्यातून लाखो रुपये काढले, तसेच १० तोळे सोनेही जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी सटाणा तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे फिर्यादी महिला घरात एकटी असताना आरोपी निलेश अशोक पगार (वय ३०, रा. उत्राणे, नामपूर, ता. सटाणा) तिच्या घरी आला. त्याने महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ आपल्या ताब्यात असल्याचे सांगत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत आरोपीने महिलेकडून बँक ऑफ महाराष्ट्रचे ११ कोरे धनादेश घेतले. त्यांचा गैरवापर करून तिच्या खात्यातून सुमारे १६ लाख रुपये काढले. याशिवाय सतत ब्लॅकमेल करत ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ६२ लाख रुपये उकळले. अशा प्रकारे एकूण ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीने तिच्या घरी येऊन तिच्या दोन मुलींसोबतही गैरवर्तन केले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करत, पैसे न दिल्यास मुलींना जीवे मारण्याची तसेच महिलेची बदनामी करण्याची धमकी दिली. याच धमकीच्या जोरावर घरात ठेवलेले लग्नातील १० तोळे सोनेही जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आरोपी निलेश पगारविरुद्ध बलात्कार, फसवणूक, खंडणी, धमकी आणि अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बुवा पुढील तपास करीत आहेत.
अश्लील फोटो व्हायरलची धमकी… चार वर्षे महिलेवर अत्याचार; ब्लॅकमेल करत ७८ लाखांची लूट
Leave a Comment





