कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह! चौकशीची मागणी

Gramin Varta
17 Views

पाटण : कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पाटण शहरातून सुरू असून, कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कामाला १० जून अशी अखेरची मुदत या कामाला देण्यात आली होती. मात्र, ती उलटूनही काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात विशेषतः नाल्यांचे काम रखडल्यामुळे पावसाळ्यात दूषित पाणी, चिखल आणि वाहतुकीच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

कराड-चिपळूण महामार्गावरील म्हावशी पेठ खरेदी-विक्री संघ पेट्रोल पंप ते मारुती मंदिर या दरम्यान नाल्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या ठिकाणी नाला आणि नव्याने बांधलेल्या काँक्रिट रस्त्यामधील जागा मुरूम, दगड किंवा गोटे टाकून भरण्याऐवजी थेट माती टाकण्यात आल्याचा आरोप नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

या राष्ट्रीय महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात टँकर, मालवाहू ट्रक आणि अवजड वाहने धावत असतात. अशा परिस्थितीत एखादे वाहन काँक्रिट रस्त्याच्या कडेला उतरल्यास मातीचा भराव खचण्याची किंवा वाहन अडकण्याची शक्यता असल्याने भविष्यात गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी अनेक राजकीय पक्ष, संघटना यांच्याकडून वारंवार करण्यात आल्या. मात्र, संबंधित विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात माती वाहून गेल्यास रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे निर्माण होऊन वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त होत आहे.

संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

नाला आणि काँक्रिट रस्त्याच्या मधील जागेत मुरूम व दगड टाकण्याची तरतूद अंदाजपत्रकात आहे की माती टाकण्याची, याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी वाहनचालक, नागरिकांकडून होत आहे. यासोबतच, कामाच्या गुणवत्तेची तज्ज्ञांकडून तपासणी करून निकृष्ट काम आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही प्रवासी, वाहनचालकांची मागणी जोर धरत आहे.

Total Visitors :
4632628
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *