EPFO 3.0: एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची सुविधा लवकरच होणार सुरू; आयुक्तांची मोठी घोषणा

Gramin Varta
74 Views

दिल्ली: केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत ‘ईपीएफ ३.०’ अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून, यादरम्यान पीएफ खात्यातून थेट एटीएम किंवा यूपीआयद्वारे पैसे काढण्याची बहुप्रतिक्षित सुविधा लवकरच सुरू होणार आहे. ही सुविधा कधी सुरू होणार याकडे लाखो नोकरदार आणि निवृत्तीधारकांचे लक्ष लागलेले असतानाच, पूर्वी १ ऑगस्ट २०२६ पासून ही सेवा सुरू होईल अशी चर्चा होती. मात्र, आता या संदर्भात केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी महत्त्वाची अपडेट दिली असून, मिळालेल्या माहितीनुसार पुढील एका महिन्याच्या आत ही नवी सुविधा प्रत्यक्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर ईपीएफओ सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकीकडे एटीएम आणि यूपीआय सुविधेची प्रतीक्षा सुरू असतानाच, दुसरीकडे ईपीएफओच्या नव्या डिजिटल सिस्टीममध्ये सदस्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोर्टलवर लॉगिन करताना अडथळे येत असून पीएफ क्लेम सेटलमेंटसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. ईपीएफओची अधिकृत वेबसाईट अत्यंत संथ गतीने चालत असून बॅलन्स चेक करताना त्रुटी दाखवत आहे, ज्यामुळे सदस्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अशा तांत्रिक व इतर कारणांमुळे तुमचा पीएफ क्लेम किंवा ट्रान्सफर कधीही अडकू शकतो, जसे की मेंबर आयडी, सर्व्हिस हिस्टरी किंवा बँक खात्याचा तपशील चुकीचा असल्यास क्लेम नाकारला जातो. याशिवाय, आधार, पॅन आणि बँक खात्याचे केवायसी अपडेट नसेल, तर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ खाती असतील आणि ती मर्ज केलेली नसतील, तर ट्रान्सफरमध्ये समस्या उद्भवू शकते. नोकरी सोडल्यानंतर पीएफ काढण्यासाठी पोर्टलवर डेट ऑफ एक्झिट अपडेट असणे अनिवार्य आहे, तसेच तुमच्या आधार किंवा पॅन कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि पीएफ खात्यातील नोंदी यामध्ये फरक असल्यास क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ईपीएफओ सदस्यांनी आपला पीएफ क्लेम सबमिट करण्यापूर्वी आपली केवायसी आणि वैयक्तिक माहिती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करून घेणे गरजेचे ठरते, जेणेकरून तांत्रिक अडचणींमुळे क्लेम फेटाळला जाणार नाही.

विशेष म्हणजे, ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे अशांनी आपले भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी ईपीएफओचे आवश्यक काम लगेच करून घेणे हिवाळा ठरत आहे, अन्यथा पीएफचे लाखो रुपये अडकू शकतात. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ हे भविष्यकाळाचे सुरक्षा कवच मानले जाते, जिथे दीर्घकाळात चक्रवाढ व्याजासह एक मोठी रक्कम कर्मचारी निवृत्तीसमयी मिळवत आला आहे. नव्या ईपीएफ ३.० नियमांमध्ये आजारपण, शिक्षण किंवा लग्नासाठी जमा रकमेच्या तब्बल ७५ टक्क्यांपर्यंतचा भाग थेट काढण्याची मुभा देण्यात आली आहे. जुन्या नियमात संपूर्ण सेवाकाळात लग्न किंवा शिक्षणासाठी केवळ तीनदाच पैसे काढता येत होते, ती मर्यादा आता शिक्षणासाठी १० वेळा आणि लग्नासाठी ५ वेळा करण्यात आली आहे. शिवाय, हे पैसे काढणे अधिक सुलभ करण्यासाठी थेट एटीएम कार्ड आणि यूपीआयची सोय केली जाणार आहे.

- Advertisement -

मात्र, ईपीएफचा मुख्य उद्देश भविष्य निर्वाह हाच आहे आणि जेव्हा पैसे काढणे बँकेइतकेच सोपे व झटपट होईल, तेव्हा कामगार दैनंदिन गरजा किंवा चैनीसाठीही पीएफचा निधी खर्च करून टाकू शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परिणामी, निवृत्तीच्या वेळी हाताशी अत्यंत तुटपुंजी रक्कम शिल्लक राहील आणि सामाजिक सुरक्षेची इतर साधने उपलब्ध नसताना, निवृत्ती निधीचा असा संकोच होणे म्हणजे कामगारांचे वार्धक्य अंधारात ढकलण्यासारखेच आहे, असे मतही तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

Total Visitors :
4632618
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *