राजापूर : तालुक्यातील सागवे बुरंबेवाडी येथे डोक्याच्या आजाराला कंटाळून एका ३२ वर्षीय महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सौ. आरती संदिप गुरव (रा. उपळे गुरववाडी, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही खबर देणार ओकार बाळकृष्ण फुटक यांची बहीण होती. २ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या भावाच्या सागवे बुरंबेवाडी येथील घरातील वरच्या मजल्यावर डोक्याच्या सततच्या आजाराला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. तिने ओढणीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार करण्यात आली असून, पुढील तपास नाटे पोलीस करत आहेत.






