राजापूर: कोदवलीतील धोकादायक वळणावर मिठाने भरलेला ट्रक पलटी;चालक किरकोळ जखमी

Gramin Varta
130 Views

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोदवली येथील महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक वळणावर गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मिठाने भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, (GJ-12-BV-6644) क्रमांकाचा ट्रक मुंबईहून गोव्याच्या दिशेने मिठाची पोती घेऊन जात होता. महालक्ष्मी मंदिराजवळील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक प्रथम दुभाजकावर चढला आणि त्यानंतर विरुद्ध दिशेच्या मार्गावर पलटी झाला.

अपघातामुळे ट्रकमधील मिठाची पोती महामार्गावर विखुरली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, अपघाताच्या वेळी समोरील मार्गावर कोणतेही वाहन नसल्याने संभाव्य भीषण अपघात टळला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बॅरिकेड्स उभारले आणि आवश्यक उपाययोजना केल्या. तसेच अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शुक्रवारी पलटी झालेला ट्रक हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडल्याने कोदवली परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक वळणावर कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Total Visitors :
4580960
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *