राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या मटका, जुगार आणि ऑनलाईन जुगारासारख्या बेकायदेशीर धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या व गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चालली आहे. या अवैध व्यवसायांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण राजापूर तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे राजापूर तालुका सरचिटणीस समीर जनार्दन खानविलकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी राजापूर पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले असून राजापूर पोलीस ठाण्याने ते स्वीकारले आहे.
खानविलकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पाचल येथील रहिवासी शशांक रवींद्र नारकर हा संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये जुगार, मटका व ऑनलाईन जुगाराचे अवैध धंदे चालवत आहे. या बेकायदेशीर व्यवसायांमुळे स्थानिक युवा पिढीचे मोठे नुकसान होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.संबंधित व्यक्तीला राजकीय वरदहस्त असल्याने त्याला कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही. ‘माझ्या अवैध धंद्यांना कोणीही हात लावू शकत नाही’ अशा प्रकारची अरेरावीची भाषा वापरून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही समीर खानविलकर यांनी केला आहे.
राजापूर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन शशांक नारकर याच्यासह तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई न केल्यास तालुक्यात जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.




