१२ ऑक्टोबरला नियुक्तीपत्रे; जिल्ह्यातील सर्व उपविभागांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर
राजापूर/ राजू सागवेकर : जिल्ह्यातील सर्व उपविभागांतील रिक्त पोलीस पाटील पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचा कालबद्ध कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या उपविभागीय शाखेने जाहीर केला आहे. यामुळे पोलीस पाटील पदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय स्तरावर रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची भरती एकाचवेळी करण्याबाबत कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ तसेच शासन निर्णय व परिपत्रकांतील तरतुदींनुसार ही प्रक्रिया पार पडणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया
भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गावनिहाय आरक्षण निश्चित करून जाहिरात नोटीस प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया होणार आहे.
यानंतर २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत आरक्षणावर आक्षेप मागविण्यात येणार आहेत. १० सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, त्याच दिवसापासून २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहेत.
२८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अर्जांची छाननी करून प्रवेशपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा, ५ ऑक्टोबर रोजी निकाल प्रसिद्ध, तर ६ ऑक्टोबर रोजी तोंडी परीक्षा (मुलाखत) घेऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून १२ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
पोलीस पाटील भरती प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार, पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीकडे लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीचा मार्ग मोकळा; २४ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू
Leave a Comment




