रत्नागिरी: ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विशेष शोध मोहिमेत हत्तीरोगाचे तब्बल ८३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात १६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ०.८० टक्के इतका नोंदवला गेला आहे. हत्तीरोगाचे वेळेत अचूक निदान करून रुग्णांवर तातडीने योग्य उपचार सुरू करण्याच्या उद्देशाने ही धडक तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यातून आतापर्यंत १० हजार ४४४ रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले होते. त्यापैकी १० हजार ३७४ नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी पूर्ण झाली असून, यामध्ये ८३ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास दापोली तालुक्यात सर्वाधिक २५ रुग्ण आढळले असून, त्यापाठोपाठ चिपळूणमध्ये २२, खेडमध्ये १२, रत्नागिरीत ८, गुहागरमध्ये ६, लांजामध्ये ६ आणि मंडणगड तालुक्यात ४ रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
दरम्यान, हत्तीरोग तसेच अंडवृद्धी (हायड्रोसिल) आजाराची लक्षणे किंवा संशय असलेल्या नागरिकांनी कोणतीही भीती अथवा संकोच न बाळगता आरोग्य पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लक्षणांची माहिती न लपवता मोफत तपासणी करून घ्यावी, जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील. ३१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या शोध मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.




