‘परिस्थितीला दोष देऊ नका, स्वतःची परिस्थिती स्वतः बदला!’ : नितीन बानगुडे पाटील
लांजा / अरबाज नेवरेकर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने लांजा येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व प्रेरणादायी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थापक निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला तीन हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.
व्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि कष्टाचा मंत्र देत, “यशासाठी कारणे देत बसू नका. परिस्थिती कधीच माणसाला घडवत नाही; माणूस आपल्या कर्तृत्वाने परिस्थिती घडवतो. ध्येय मोठे ठेवा आणि ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा,” असे आवाहन केले.
बानगुडे यांनी एका मुलीचे उदाहरण देत जिद्दीची ताकद विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. स्पर्धेसाठी बूट घेण्याइतके पैसे नसतानाही तिने हार न मानता पायाला बांधलेल्या पट्टीच्या सहाय्याने बुटाचा आकार तयार केला आणि स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. “तिचा विचार बुटात नव्हता, तो तिच्या डोक्यात होता; म्हणूनच ती जिंकली,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय सोडू नये, असा संदेश दिला.
“अडचणींकडे पाहत बसाल तर अडचणीच दिसतील; ध्येयाकडे पाहाल तर यशाचा मार्ग दिसेल,” या संदेशाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
यावेळी निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी संस्था उभी राहणार असून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व कौशल्याधारित प्रशिक्षणासाठी मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून देतानाच जिजाऊ रुग्णालयाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या २१० विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक व भिंतीवरील घड्याळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा, तसेच महिला बचत गटांचा सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला तहसीलदार प्रियंका ढोले, नगराध्यक्षा सावली कुरूप, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, माजी आमदार राजन साळवी, राजन देसाई, भाऊ वंजारे, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले.
लांजा येथे जिजाऊ संस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा; नितीन बानगुडे-पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Leave a Comment




