तीन वर्षे उपसरपंच, पाच वर्षे सरपंच; तरी मतदार यादीतून नाव गायब

Gramin Varta
188 Views

मतदार यादीतील नाव गायब झाल्याने जयगडच्या अनिरुद्ध साळवी यांनी मारले डोक्यावर हात

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या कारभारात तब्बल आठ वर्षे जबाबदारी सांभाळलेल्या माजी सरपंचाचेच नाव मतदार यादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार जयगड येथे समोर आला आहे. माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी यांनी याबाबत तहसीलदार तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

साळवी यांनी १९९६ ते १९९९ या काळात जयगड ग्रामपंचायतीचे सदस्य व उपसरपंच म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९९९ ते २००४ या कालावधीत सलग पाच वर्षे सरपंचपदाची जबाबदारी सांभाळली. पुढे २००९ ते २०१४ या काळात ते पुन्हा ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, सध्या निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांची पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत २००२ च्या मतदार यादीची तपासणी करताना जयगड येथील रहिवासी अनिरुद्ध साळवी यांचे नाव यादीत नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, त्यांचा विवाह जुलै २००० मध्ये झाला असून पत्नीचे नाव २००२ च्या मतदार यादीत समाविष्ट आहे. मात्र स्वतःचे नावच यादीतून गायब असल्याने साळवी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारात दीर्घकाळ पदाधिकारी म्हणून काम केलेल्या व्यक्तीचे नावच शासकीय मतदार यादीतून गायब होणे हा गंभीर प्रकार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच नाव मतदार यादीतून कसे व कोणत्या कारणामुळे वगळले गेले याचा शोध घ्यावा, अशी मागणी साळवी यांनी केली आहे.

मतदार यादीच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकाराची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते, याकडे जयगड परिसराचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4745459
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *