लांजा/अरबाज नेवरेकर : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथील उड्डाणपुलाच्या काँक्रिट प्लेट्स सरकल्याचा आणि त्यामधून पाणी वाहत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.
अखेर संबंधित ठेकेदाराने तातडीने हालचाल सुरू केली असून, शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी उपशेट्येवाडी येथील उड्डाणपुलाच्या काँक्रिट प्लेट्सला मजबुती देण्यासाठी नेलिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या संतापाची आणि माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची अखेर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँक्रिट प्लेट्स सरकणे, सैल होणे आणि त्यातून पाणी वाहू लागणे ही बाब साधी नसून, मुंबई-गोवा महामार्गासारख्या सतत वर्दळीच्या मार्गावरील उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. या प्रकारामुळे कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना पुलाच्या संरचनेत अशा प्रकारची समस्या निर्माण होणे धोकादायक ठरू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती.
नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर आणि हा प्रकार प्रसिद्ध झाल्यानंतर ठेकेदाराने प्लेट्सच्या मजबुतीकरणासाठी नेलिंगचे काम सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी केवळ तात्पुरती डागडुजी करून विषय संपवू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्लेट्स का सरकल्या? पाणी आत कसे शिरले? बांधकामाच्या दर्जात नेमकी कुठे त्रुटी राहिली? या प्रश्नांचीही तपासणी होणे गरजेचे आहे. नेलिंगचे काम पूर्ण केल्यानंतर उड्डाणपुलाची संपूर्ण संरचनात्मक पाहणी करून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या संतापानंतर ठेकेदाराला तातडीने काम सुरू करावे लागले, ही बाब प्रशासनासाठीही इशारा देणारी आहे. नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच यंत्रणा जागी होणार असेल, तर नियमित देखभाल आणि तपासणीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवालही आता उपस्थित होत आहे. त्यामुळे सुरू करण्यात आलेले नेलिंगचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांना ठोस दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
लांजा : उड्डाण पुलाच्या काँक्रिट प्लेटमधून पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांमधून संताप, यंत्रणा खडबडून जागी
Leave a Comment




