लांजा : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे लांजा शहरातील सर्व्हिसरस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तहसील कार्यालय ते हायस्कूल तसेच कुणबी पतसंस्थेपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने आणि त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर हे खड्डे अधिक धोकादायक बनत असून, वाहनांची खड्ड्यांमध्ये आदळआपट होत आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची अशी अवस्था असताना प्रशासन नेमके कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे सर्व्हिसरस्त्यांची दुरवस्था झाली असताना त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीसाठी योग्य करणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील धोकादायक भाग ओळखणे कठीण होत आहे.
दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी लांजा शहरातील सर्व्हिसरस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख मोहन तोडकरी यांनी दिला आहे. “लांजा शहरातील सर्व्हिसरस्त्याची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व्हिसरस्ता दुरुस्त न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
गंभीर अपघात घडण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या जीवघेण्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी आणि सर्व्हिसरस्ता प्रवासासाठी योग्य करावा, अशी मागणी लांजावासीयांकडून होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची वेळ येऊ नये, यासाठी आता केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
लांजा शहरातील सर्व्हिसरस्त्यांची अक्षरशः चाळण; खड्ड्यांच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त!
Leave a Comment




