गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची मोठी सुविधा; मुंबईसह गुजरातहून रत्नागिरी-सावंतवाडीसाठी अतिरिक्त विशेष गाड्या

Gramin Varta
130 Views

रत्नागिरी : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार मुंबई, वडोदरा, विश्वामित्री, उधना आणि वलसाड येथून रत्नागिरी तसेच सावंतवाडी रोडकडे जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यामध्ये मुंबई सेंट्रल–ठोकूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०९०१३ ही ८ सप्टेंबर रोजी धावणार असून तिची परतीची ठोकूर–मुंबई सेंट्रल विशेष गाडी क्रमांक ०९०१४ ही ९ सप्टेंबर रोजी धावेल. मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड विशेष गाडी क्रमांक ०९०१९ ही ९ सप्टेंबरला, तर सावंतवाडी रोड–मुंबई सेंट्रल विशेष गाडी क्रमांक ०९०२० ही १० सप्टेंबरला धावणार आहे. याशिवाय वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी आणि रत्नागिरी–वांद्रे टर्मिनस अशा अनारक्षित साप्ताहिक विशेष गाड्यांच्याही फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत.

गुजरातकडून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वे प्रशासनाने विशेष सुविधा केली आहे. वडोदरा जंक्शन–रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०९११४ या गाडीच्या ८ आणि २२ सप्टेंबर रोजी दोन फेऱ्या होणार असून रत्नागिरी–वडोदरा जंक्शन विशेष गाडी क्रमांक ०९११३ ही ९ आणि २३ सप्टेंबर रोजी धावणार आहे. विश्वामित्री–रत्नागिरी आणि रत्नागिरी–विश्वामित्री मार्गावरही विशेष गाड्या चालविण्यात येणार असून उधना–रत्नागिरी, रत्नागिरी–उधना तसेच वलसाड–रत्नागिरी आणि रत्नागिरी–वलसाड मार्गावरही प्रत्येकी विशेष फेरीची व्यवस्था करण्यात आली आहे.

या अतिरिक्त विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी मुंबई, गुजरात आणि अन्य भागांतून रत्नागिरीसह कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे ट्रेन क्रमांक ०९०१४, ०९०२०, ०९०३६, ०९११३, ०९१०९, ०९१२३, ०९०२१ आणि ०९०२९ या गाड्यांचे आरक्षण १५ ऑगस्ट २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होणार आहे. प्रवाशांनी गाड्यांचे थांबे आणि वेळापत्रकाची अद्ययावत माहिती घेऊन या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4699720
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *