रत्नागिरी : पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’वर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत एका महिलेवर गुन्हा दाखल

Gramin Varta
967 Views

रत्नागिरी : तालुक्यातील पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’वर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाली येथील श्रद्धा सबुरी लॉजमध्ये महिलांना आणून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष आणि बोगस ग्राहकाच्या सहाय्याने सदर लॉजवर छापा टाकला. कारवाईदरम्यान लॉजमधील एका खोलीत एक महिला आढळून आली. चौकशीमध्ये ती इतर पीडित महिलांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी पंचांसमक्ष वेश्यागमनासाठी घेतलेली दोन हजार रुपये रोख रक्कम, पाच हजार रुपये किमतीचा व्हिव्हो कंपनीचा मोबाईल आणि पाच सीलबंद निरोध पाकिटे असा एकूण सात हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आर्थिक लाभासाठी बाहेरच्या शहरातून महिलांना बोलावून त्यांना लॉजमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३ (२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4684842
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *