रत्नागिरी: बहिणीच्या लग्नाचा राग अन् चायनीज सेंटरबाहेर मध्यरात्री राडा; पिस्तूलसदृश एअरगन काढल्याने खळबळ

Gramin Varta
600 Views

रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर परिसरात चायनीज सेंटरबाहेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार राड्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बहिणीने आपल्या मर्जीने लग्न केल्याच्या रागातून तिच्या भावाने चायनीज सेंटरवर जाऊन गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. यावेळी ‘माझ्या बहिणीला फूस लावलीस, तुला बघतोच’ असे म्हणत त्याने पिस्तूलसदृश हत्यार बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्यमनगर-ओसवालनगर परिसरातील एका तरुणाच्या बहिणीने लग्न केले असून या विवाहाला तिच्या भावाचा विरोध असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी संबंधित तरुणी घरी आली होती. त्यानंतर कपड्यांची बॅग घेऊन ती घरातून निघून गेल्याने तिच्या भावाचा संताप झाला. याच रागातून रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तो आरोग्य मंदिर परिसरातील एका चायनीज सेंटरवर पोहोचला.

चायनीज सेंटरवर आल्यानंतर त्याने तेथे गोंधळ घातल्याचे सांगण्यात येते. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली. वाद चिघळत असतानाच संबंधित तरुणाने पिस्तूलसदृश हत्यार बाहेर काढल्याने घटनास्थळी उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी तेथून बाजूला होणे पसंत केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पिस्तूलसदृश हत्यार आढळून आले. सुरुवातीला ते रिव्हॉल्व्हर असल्याचा संशय व्यक्त झाल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. मात्र, तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतर हे रिव्हॉल्व्हर नसून माकडांना पळविण्यासाठी वापरली जाणारी एअर रिव्हॉल्व्हर असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यक्ती तसेच अन्य नागरिक शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी एनसी दाखल करण्यात आल्या असून शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :
4684842
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *