राजापूर: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शोध नवमूर्ती कलाकारांचा या अभिनव संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांची होती.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या कलात्मक कौशल्यातून आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. स्पर्धेतील पाचवी ते सातवी या गटामध्ये रायपाटण शाळा क्रमांक एकची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी दूर्वा मंगेश पराडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर लगेचच झालेल्या राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघ गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत देखील दूर्वा पराडकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी उपस्थित असलेले जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी तिचे विशेष कौतुक केले.
दूर्वा पराडकर हिने मातीपासून हुबेहूब गणपतीची मूर्ती साकारून सर्व प्रेक्षक व परीक्षकांची दाद मिळवली. ती एक उत्तम नृत्यांगना म्हणून संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध असून अनेक नृत्य स्पर्धेत तिने पारितोषिके पटकावली आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये तिने स्थान मिळवून रायपाटण नंबर एक शाळेचे नाव उंचावले आहे. दूर्वा ही एक उत्तम रांगोळी आणि चित्रकार कलाकार देखील असून चित्रकला स्पर्धेतही तिने अनेक बक्षीस मिळवली आहेत. तिने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.





