पाचल / तुषार पाचलकर: विठापेठ–मलकापूर–अनुस्कुरा–साटवली–पावस या राज्य महामार्गावरील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी (दि. २ ऑगस्ट) पाचल ग्रामपंचायत हद्दीतील उचवल्या परिसरात दोन ते तीन मोठी झाडे मुळासकट रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पाचल ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी तात्काळ संपर्क साधून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. मात्र, विभागाकडून त्वरित यंत्रणा घटनास्थळी पाठविण्याऐवजी एका ठेकेदाराला याबाबत माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थ आणि या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम केले. त्यानंतर सुमारे तासाभराने या मार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
ओणी–पाचल–अनुस्कुरा मार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असून त्यांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या आंबा घाट जड वाहतुकीसाठी बंद असल्याने या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील समस्या तातडीने सोडवून रस्त्याची दुरुस्ती तसेच धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अन्यथा विभागाच्या कथित निष्क्रियतेविरोधात या मार्गावरील नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
राजापूर: उचवल्या परिसरात झाडे कोसळून अनुस्कुरा मार्गावरील वाहतूक ठप्प; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप
Leave a Comment






