रत्नागिरी: निवसरजवळ रेल्वे मार्गावर अनोळखी तरुणाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळला

Gramin Varta
514 Views

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ते निवसर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर एका अनोळखी पुरुषाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास निवसर रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या राजेंद्र सिंह मनेश्वर चौहान यांना फोन करून पोमेडी बुद्रुक ते निवसर दरम्यान कि.मी. २०८/४-५ येथे एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे अंदाजे ३१ ते ३५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

सदर मृताची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी २ ऑगस्ट रोजी रात्री ११.१६ वाजता बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासह मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :
4630113
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *