राजापुरात खळबळ : भर दुपारी घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Gramin Varta
1439 Views

मुलीने मोठ्याने आरडाओरडा केल्याने नागरिक धावले

राजापूर : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणातील आरोपी नरेश काशीराम गुरव (वय २८, ता. राजापूर) याने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. मात्र पीडितेने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यानंतर पीडितेचे वडीलही तेथे पोहोचले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे मेजर दत्ताराम बाणे, पोलीस कर्मचारी निलेश कात्रे, स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५(१), ७६ तसेच पॉक्सो कायदा कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास राजापूर पोलीस सहाय्यक निरीक्षक दीपज्योती पाटील करीत आहेत. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला कायद्यानुसार जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेने राजापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Total Visitors :
4820502
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *