घाटमाथ्यापासून अर्ध्या घाटापर्यंत दृश्यमानता अत्यंत कमी; रात्री अवजड वाहनांसह खड्ड्यांमुळे धोका
पाचल / अंकुश पोटले : राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात सध्या दाट धुक्याने मोठ्या प्रमाणात विळखा घातला असून, घाटमाथ्यापासून अर्ध्या घाटापर्यंत वाहनचालकांना अत्यंत कमी दृश्यमानतेचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा पुढील भाग स्पष्टपणे दिसत नसल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक गंभीर होत असून, अवजड वाहनांची मोठी वर्दळ आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
अनुस्कुरा घाटातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. रात्रीच्या वेळीदेखील मालवाहू तसेच अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असल्याने धुक्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसोटी लागते. दाट धुक्यामुळे रस्त्याची कड, पुढील वळण आणि समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण बनते. त्यातच समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे काही क्षणांसाठी दृश्यमानता आणखी कमी होत असल्याने धोका वाढतो.
घाटातील काही भागांत असलेले खड्डे ही परिस्थिती अधिकच गंभीर करत आहेत. कमी दृश्यमानतेमुळे खड्डे वेळीच लक्षात न आल्याने वाहनचालकांना अचानक वेग कमी करावा लागतो किंवा वाहनाचा मार्ग बदलावा लागतो. अशा वेळी समोरून अवजड वाहन येत असल्यास अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. तीव्र वळणे, उतार आणि धुक्याचे वातावरण यामुळे घाटमार्गावर वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची वेळ आली आहे.
धुक्याच्या काळात रस्त्याची दिशा आणि कड सहज लक्षात यावी यासाठी अनुस्कुरा घाटात पुरेशा प्रमाणात रिफ्लेक्टर आणि स्पष्ट रोड मार्किंग असणे आवश्यक आहे. धुक्याची तीव्रता अधिक असलेल्या ठिकाणी तसेच धोकादायक वळणे आणि उताराच्या भागात साईड रिफ्लेक्टर बसविल्यास वाहनचालकांना मार्गाचा अंदाज घेणे सुलभ होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने घाटाची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
अनुस्कुरा घाट हा कोकणातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने या मार्गावरील सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या धुके आणि खड्डे या दोन्ही समस्यांचा सामना वाहनचालकांना करावा लागत असल्याने संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती, साईड पट्ट्यांची व्यवस्था, रिफ्लेक्टर बसविणे आणि आवश्यक रोड मार्किंग करणे याकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
दाट धुक्यात रस्ता स्पष्टपणे दिसत नसताना रिफ्लेक्टरचा प्रकाश वाहनचालकांसाठी महत्त्वाचा मार्गदर्शक ठरू शकतो. त्यामुळे अपघातानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य धोका लक्षात घेऊन अनुस्कुरा घाटातील सुरक्षाव्यवस्था तातडीने मजबूत करावी, अशी अपेक्षा प्रवासी आणि वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.





