राजापूर / तुषार पाचलकर: रत्नागिरी जिल्हा योगासन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत V फिटनेस & मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरच्या खेळाडूंनी अतिशय दमदार कामगिरी नोंदवली आहे. राजापूर तालुक्यातील पाचल व ओझर शाखेच्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याची छाप पाडली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या आर्टिस्टिक पेअर प्रकारात पल्लवी पांडुरंग मालपेकर आणि दुर्वा मंगेश गुरव या जोडीने उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर दिमाखदार कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत V फिटनेसच्या माध्यमातून नियमित सराव करणारे साई गुरव, अनय चंद, आजम नेवरेकर, दुर्वा रेगे, वैदेही नवलु, श्रुती पळसमकर आणि स्नेहल पळसमकर या खेळाडूंनीही उल्लेखनीय सहभाग नोंदवला. सर्वच खेळाडूंनी अप्रतिम शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि योगकौशल्याचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. सहभागी खेळाडूंमध्ये प्रामुख्याने ओझर नंबर एक शाळा तसेच कारवली हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच क्रीडा, योग आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व कळावे या उद्देशाने V फिटनेस & मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरच्या वतीने सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. या यशामागे प्रशिक्षक युवराज मोरे, रामचंद्र मोरे, शैलेन्द्र बनसोडे, दत्तात्रय गायकवाड आणि दादासो ठोंबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि खेळाडूंचा नियमित सराव यामुळेच हे यश संपादन करता आले आहे.
योगासनातून शरीरासोबतच मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. ग्रामीण भागातील मुलांच्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि उद्याचे राष्ट्रीय खेळाडू घडावेत यासाठी हे केंद्र कार्यरत असून हे यश म्हणजे त्यांच्या प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. जिल्हास्तरावर पाचल, ओझरसह संपूर्ण राजापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पल्लवी मालपेकर, दुर्वा गुरव व इतर सर्व सहभागी खेळाडूंवर सध्या क्रीडाप्रेमींसह सर्वच स्तरांतून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






