रत्नागिरीतील कस्तुरी चायनीज सेंटरमधील वाद चिघळला; रिव्हॉल्वर दाखवून धमकावल्याच्या आरोपींची चौकशी करा

Gramin Varta
334 Views

अँटी करप्शन कमिटीचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट समीर काझी यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

रत्नागिरी : शहरातील कस्तुरी चायनीज सेंटर येथे जेवणावरून झालेल्या वादाला गंभीर वळण लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. वादाच्या वेळी रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत अँटी करप्शन कमिटीचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट तथा सामाजिक कार्यकर्ते समीर काझी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

समीर काझी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास कस्तुरी चायनीज सेंटर येथे जेवणावरून वाद झाला. या वादादरम्यान काही व्यक्तींनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा तसेच रिव्हॉल्वर दाखवून धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे काझी यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याचे काझी यांनी सांगितले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तीकडील रिव्हॉल्वर ताब्यात घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यानंतर प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आले, त्याबाबत काझी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रिव्हॉल्वरची तपासणी केल्यानंतर ती खेळण्यातील रिव्हॉल्वर असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, हे हत्यार नेमके कोणत्या प्रकारचे आहे, याची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून सत्यता स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी काझी यांनी केली आहे.

या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे तपासून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रिव्हॉल्वर दाखवून धमकी देण्यात आली का, घटनेच्या वेळी नेमके काय घडले आणि पोलिसांनी त्यानंतर कोणती कारवाई केली, याची चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका समीर काझी यांनी मांडली आहे. तसेच आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या तक्रारीच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, शहर पोलीस निरीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेले आरोप हे तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार असून, पोलिसांकडून होणाऱ्या अधिकृत चौकशीनंतरच घटनेचे नेमके स्वरूप आणि आरोपांमधील तथ्य स्पष्ट होणार आहे.

Total Visitors :
4723684
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *