३६ स्पर्धकांचा सहभाग; तब्बल १२ तास रंगला अभिवाचनाचा रंगमंच
रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मराठी अभिवाचन स्पर्धा दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी कॅप्टन ठाकूर सभागृह, पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३६ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तब्बल १२ तास चाललेल्या या स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त विनायक हातखंबकर, नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर, परीक्षक संजय बोरकर आणि राजेंद्र कुमार घाग यांच्या उपस्थितीत झाले. दीपप्रज्वलन व नटराज पूजनानंतर ज्येष्ठ रंगकर्मी तथा नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नगराध्यक्ष सुर्वे यांनी रत्नागिरीतील रंगकर्मींना महत्त्वाचे आश्वासन दिले. राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रत्नागिरीतील संघांना नगरपरिषदेच्या मालकीचे शहरातील विविध हॉल व ॲक्टिव्हिटी सेंटर अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सांघिक पारितोषिकांमध्ये कलारंग नाट्य प्रतिष्ठान, वरवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अनन्या एंटरटेनमेंट, जांभरुण यांना द्वितीय, तर गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांना तृतीय क्रमांक मिळाला. श्रद्धा मयेकर आणि टीम यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पूजा जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मधुरा लाकडे यांनी द्वितीय, योगेश चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रसिका सहस्रबुद्धे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संपूर्ण कार्यकारिणीने मेहनत घेतली. स्पर्धेच्या नियोजनासाठी अनिल दांडेकर, अनुया बाम, श्रीकांत पाटील आणि ॲड. श्रीकांत भाटवडेकर यांच्या टीमने केलेल्या उत्तम नियोजनाचे स्पर्धकांनी विशेष कौतुक केले.
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह वामन कदम यांनी सूत्रसंचालन केले. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन सुनील बेंडखळे यांनी केले. जिल्ह्यातील रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींच्या सहभागामुळे अभिवाचन स्पर्धा उत्साहात पार पडली.
रत्नागिरीत मराठी अभिवाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Leave a Comment






