राजापूर/ तुषार पाचलकर : तालुक्यातील सौंदळ मुसलमानवाडी येथून मानसिक रुग्ण असलेली एक तीस वर्षीय महिला घरून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम युसुफ पाटणकर असे या ३० वर्षीय महिला मजुराचे नाव आहे. ती मानसिकदृष्ट्या आजारी असून तिच्यावर प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे औषधोपचार सुरू आहेत. तिला वारंवार घरातून निघून जाण्याची सवय असून यापूर्वी देखील ती अशा प्रकारे निघून गेली होती आणि काही दिवसांनी परत आली होती. दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा ते पाच ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान ती सौदळ मुसलमावाडी येथील घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा नातेवाईकांमध्ये व आसपासच्या परिसरात सखोल शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळून आली नाही. चार दिवस तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा चार वाजता तिच्या वडिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात येऊन याबाबतची अधिकृत तक्रार नोंदवली.
मिळालेल्या वर्णनानुसार बेपत्ता महिला गोऱ्या रंगाची, अंग सडपाताळ, चेहरा उभट, उंची सुमारे पाच फूट पाच इंच असून तिने लाल रंगाचा अनारकली ड्रेस आणि निळ्या रंगाची ओढणी परिधान केली आहे. तिच्या डोक्याचे केस काळे व लांब असून ती कोणताही मोबाईल वापरत नाही. या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत. सदर महिला किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी राजापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





