राजापूर : तालुक्यातील वडदहसोळ येथील पळसमकरवाडी परिसरात गवारेड्यांच्या कळपाने धुमाकूळ घालत नव्याने लावलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी मोठ्या कष्टाने लावणी केलेली शेती एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा करून शेतीची लावणी करावी लागली होती. अशा परिस्थितीत रात्री गवारेड्यांचा कळप शेतात घुसल्याने संदीप विठ्ठल पळसमकर, अजित पळसमकर यांच्यासह परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या भातशेतीची तुडवातुडव झाली. अनेक ठिकाणी लावलेली रोपे पूर्णपणे नष्ट झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
भातशेतीबरोबरच शेतातील काजूच्या झाडांचेही नुकसान झाले आहे. गवारेडे झाडे मुळासकट उखडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. आधीच कमी पाऊस, खतांचा तुटवडा आणि शेतीचा वाढलेला खर्च यामुळे अडचणीत आलेल्या बळीराजासमोर आता वन्यप्राण्यांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतात एखादे पीक वाचले तरी पुढे माकडांचा उपद्रव सहन करावा लागत असल्याने शेती करायची तरी कशी, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
दरम्यान, वनविभाग आणि संबंधित यंत्रणांनी या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी तसेच गवारेड्यांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वडदहसोळ परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
राजापूर – वडदहसोळमध्ये गवारेड्यांकडून भातशेती उद्ध्वस्त, वन खात्याचे दुर्लक्ष
Leave a Comment




