१५ ऑगस्टपूर्वी खड्डे बुजवा; अन्यथा खड्ड्यांत वृक्षलागवड करण्याचा तालुका अध्यक्ष दाजी गडहिरे यांचा इशारा
लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा नगरपंचायत हद्दीतील विविध अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की लांजा नगरपंचायत हद्दीत गेल्या तीन ते चार वर्षांत विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. अनेक कामांच्या निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. मात्र, विकासकामांवर मोठा निधी खर्च होऊनही शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असलेला ठेकेदार, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यापैकी नेमका कोण, याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी दाजी गडहिरे यांनी केली आहे.
ठेकेदार जबाबदार असेल तर प्रशासन कारवाई का करत नाही? आणि प्रशासन जबाबदार असेल तर लोकप्रतिनिधी गप्प का? असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, १५ ऑगस्टपूर्वी लांजा शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड केली जाईल, असा इशाराही दाजी गडहिरे यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, तहसील कार्यालय लांजा तसेच पोलीस निरीक्षक, लांजा पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी केली आहे.
लांजा शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक
Leave a Comment





