पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांची मागणी
लांजा/अरबाज नेवरेकर:- पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या लांजा तालुक्यातील माचाळ येथील ‘भिषाचा कडा’ अर्थात उलटा धबधबा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने लोखंडी संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा लांजा तालुका बौद्धजन मंडळ (ग्रामीण) अध्यक्ष संतोष जाधव यांनी केली आहे.
सध्या जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून पर्यटक वर्षासहलीसाठी माचाळ येथे मोठ्या संख्येने येत आहेत. थंडगार वारा, दाट धुके, हिरवीगार वनराई, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पावसाळ्यात निर्माण होणारा उलटा धबधबा यामुळे माचाळचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. विशेषतः शनिवार-रविवारी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
पालू-माचाळ समूह ग्रामपंचायतीकडून अतिउत्साही व मद्यधुंद पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात असून, लांजा पोलिसांकडूनही परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र, पर्यटकांनीही निसर्गाचा आनंद घेताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे संतोष जाधव यांनी नमूद केले.
माचाळ परिसरात मुचकुंदी ऋषी गुहा, ऐतिहासिक पाणवठा, सनसेट पॉइंट, मुचकुंदी नदीचे उगमस्थान तसेच उलटा धबधबा अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. ग्रामपंचायतीने सूचना व दिशादर्शक फलकही उभारले आहेत. मात्र, उलटा धबधबा परिसरातील सह्याद्रीचा उंच कडा, खडकाळ भाग आणि शेवाळामुळे पाय घसरण्याची शक्यता लक्षात घेता हा परिसर अपघातप्रवण ठरत आहे.
याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक सेल्फी व छायाचित्रणासाठी गर्दी करत असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने लोखंडी संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी संतोष जाधव यांनी केली आहे. योग्य सुरक्षाव्यवस्था उभारल्यास पर्यटकांचा जीव धोक्यात न घालता माचाळच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेणे अधिक सुरक्षित होईल, असेही त्यांनी सांगितले.







