कै. अमोल गजानन कोलगे यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन; लांजा किराणा व्यापारी संघटनेकडून कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा

Gramin Varta
772 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : सनी ऑइल कंपनीचे अधिकृत विक्री प्रतिनिधी कै. अमोल गजानन कोलगे (वय ४१) यांचे शनिवार, दि. २५ जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने व्यापारी व विक्री प्रतिनिधी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

आज (गुरुवार) सकाळी ११ वाजता सनी ऑइल कंपनीचे स्टॉकिस्ट रघुनाथ कोपरे यांच्या प्रांगणात लांजा किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कै. अमोल गजानन कोलगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या शोकसभेला रत्नागिरी–सिंधुदुर्ग पट्ट्यातील विविध कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी, लांजातील सर्व किराणा व्यापारी तसेच सनी ऑइल कंपनीचे अधिकारी प्रीतम भोसले उपस्थित होते. कै. अमोल कोलगे यांचे सहकारी आणि कायम त्यांच्या सोबत असणारे सनी कंपनीचे ओंकार सुर्वे, जेमिनी कंपनीचे संतोष चव्हाण, स्टार ऑइल कंपनीचे सचिन सापते, सोसायटी चहाचे अधिकृत विक्री प्रतिनिधी मसुरकर, सफोला कंपनीचे सचिन पावसकर, एवरेस्ट कंपनीचे प्रतिनिधी तसेच विविध कंपन्यांचे अनेक विक्री प्रतिनिधी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी कै. अमोल कोलगे यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू स्वभावाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. व्यापारी आणि विक्री प्रतिनिधी यांच्याशी त्यांनी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यावेळी अनेकांनी भावूक होत सांगितले.

यावेळी लांजा किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने कै. अमोल गजानन कोलगे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही उपस्थितांनी दिली.

सभेच्या शेवटी कै. अमोल गजानन कोलगे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळावे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

Total Visitors :
4602487
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *