रत्नागिरी/अजय सावंत : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, घराघरांत विराजमान होणाऱ्या गणरायाच्या मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या फणसोप गावातील गणेश मूर्तिकार योगेश उर्फ बाबू अरुण साळवी यांच्या घरातील कार्यशाळेत सध्या गणेशमूर्तींना आकर्षक आकार देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे गणेशमूर्ती घडविण्याचा कोणताही पारंपरिक वारसा नसतानाही योगेश साळवी यांनी आपल्या आवडीतून आणि मेहनतीतून ही कला आत्मसात केली. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या घरातच गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा सुरू केली. सुरुवातीला छंद म्हणून जोपासलेली ही कला आता त्यांच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
योगेश यांच्या कल्पकतेतून आणि हाताच्या कौशल्यातून साकारलेल्या गणेशमूर्तींना फणसोपसह ग्रामीण भागात तसेच शहर परिसरातही चांगली पसंती मिळत आहे. मूर्तीला आकार देण्यापासून ते तिच्या अंतिम सजावटीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ते बारकाईने लक्ष देतात. त्यामुळे त्यांच्या कार्यशाळेत तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना वेगळे आकर्षण प्राप्त झाले आहे.
काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या छोटेखानी कार्यशाळेचे आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गजबजलेल्या केंद्रात रूपांतर झाले आहे. विविध आकारांच्या गणेशमूर्तींना आकर्षक रूप देण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. बाप्पाच्या मूर्तींमध्ये कलात्मकता आणि आकर्षकपणा आणण्यासाठी योगेश मेहनत घेत आहेत.
*परंपरा नसली तरी कलेची आवड बनली ओळख*
गणेशमूर्ती बनविण्याची कला घराण्यातून किंवा पारंपरिक वारशातून मिळालेली नसतानाही योगेश यांनी ती आत्मसात केली, हे त्यांच्या प्रवासाचे वैशिष्ट्य आहे. आवड, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर एखादी कला जोपासता येते, याचे उदाहरण म्हणून त्यांच्या प्रवासाकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये कामाचा वेग वाढला आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे घरोघरी आगमन होणार असल्याने भक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. त्यापूर्वी गणेशमूर्ती पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
फणसोपमधील योगेश साळवी यांची कार्यशाळाही सध्या याच उत्साहाची साक्ष देत असून, त्यांच्या हातून साकारलेल्या गणरायाच्या रूपाची भक्तांना उत्सुकता लागली आहे.
मनात भक्ती, हातात कला अन् समोर साकारतोय मनमोहक गणराया! फणसोपच्या योगेश साळवींची प्रेरणादायी वाटचाल
Leave a Comment





