दापोली : कौटुंबिक वादातून सासूच्या घरातील सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या जावयाला दापोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले. विजय जयराम नामघडे (३५, रा. शेडवई पांढरेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी शुभांगी विष्णू दळवी यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दळवी या मुंबईतील कार्यक्रम आटोपून आपल्या गावी परतल्या होत्या. त्यांनी घरातील दागिने बेडवर काढून ठेवले होते. त्यानंतर त्या काही वेळासाठी घराबाहेर गेल्या. परत आल्यानंतर घराचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी घराच्या मागील बाजूस जाऊन पाहणी केली. त्यावेळी खिडकीची स्लायडिंग अर्धवट सरकविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ दापोली पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादी महिलेचा जावई विजय नामघडे हा काही दिवसांपासून त्यांच्या घरी राहत नसल्याचे तसेच त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे पोलिसांचा संशय विजय नामघडे याच्यावर बळावला. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर त्याला त्याच्या मामाच्या गावातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला विजयने उडवाउडवीची उत्तरे देत गुन्ह्याची माहिती लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला जेरबंद केल्याने दापोली पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.
दापोलीत जावयानेच सासूच्या घरातून लंपास केले आठ लाखांचे दागिने; २४ तासांत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Leave a Comment





