दापोलीतील ‘आपना नगर’ येथील पादचारी साकव धोकादायक; दुरुस्तीसाठी नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

Gramin Varta
61 Views

दापोली: दापोली नगरपंचायत हद्दीतील ‘आपना नगर’ येथील पादचारी साकव अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, तो कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, स्थानिक रहिवासी कुतबुद्दीन अली बर्डे यांनी नगरपंचायतीकडे या पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बांधलेला हा लोखंडी पूल परिसरातील नागरिकांसाठी, विशेषतः मदरसा आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुलाचे दोन्ही बाजूंचे संरक्षक भाग तुटले असून, पायाखालचे पत्रेही पूर्णपणे गंजून खराब झाले आहेत. यामुळे पादचाऱ्यांसाठी हा पूल जीवघेणा ठरत आहे.

स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या पुलाच्या दुरुस्तीबाबत नगरपंचायतीला निवेदन दिले होते, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने, नागरिकांनी काही काळापूर्वी लोकवर्गणीतून पुलाची प्राथमिक दुरुस्ती केली होती. परंतु, आता हा पूल पूर्णपणे मोडकळीस आला असून, त्यावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुतबुद्दीन अली बर्डे यांनी सादर केलेल्या निवेदनात पुलाच्या सद्यस्थितीचे पुरावे सादर केले आहेत. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा होणाऱ्या संभाव्य अपघाताची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती स्थानिक नगरसेविकांनाही देण्यात आल्या आहेत. आता नगरपंचायत प्रशासन या गंभीर समस्येकडे किती तातडीने लक्ष देते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4576135
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *