दापोली: दापोली सायकलिंग क्लबचे शरद भुवड, पंचनदी यांनी ३ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत मनाली ते लेह लडाख सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही सेल्फ सपोर्टेड म्हणजेच प्रत्येकाचे सामान आपापल्या सायकलवर घेऊन केलेली सायकल मोहीम होती. यामध्ये आदित्य दास, सुप्रिय फले, अनिल गडगे, जनार्दन वैद्यनाथन, शरद भुवड असे पाचजण होते. गाडीच्या काचेतून निसर्ग पाहणे वेगळे आणि सायकलच्या हँडलवर पकड घट्ट ठेवून, थंड वाऱ्याचे झोत अंगावर झेलत हिमालयाची चढण पार करणे वेगळे! मनाली, लाहौल आणि झांस्कर खोऱ्यातील दुर्गम रस्ते आज जगभरातील सायकलस्वारांसाठी सर्वात मोठे स्वप्न बनले आहेत.
या सायकल मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना शरद भुवड यांनी सांगितले की सायकलच्या प्रत्येक पेडलसोबत बदलणारे निसर्गाचे रुप आणि स्वतःच्या श्वासांची वाढलेली गती, हा अनुभव शब्दांत मांडता येणार नाही असाच आहे. मनालीच्या हिरवेगार दऱ्यांमधून सुरु झालेला हा सायकल प्रवास कोठी, मढी, रोहतंगचा पास, कोकसर, त्रिलोकीनाथ, कीलाँग, शिंकुला पास, झंस्कार सुम्दो, गोम्बो रांझन, पुराने, फुगताल, पदुम, कर्शा मॉनेस्ट्री, लेह लडाख, खार्दुंगला, शिलाँग ते मनाली असा ६००+ किमीचा झाला. या मोहिमेचा सर्वात थरारक टप्पा म्हणजे लेहवरुन सुरु झालेली ‘खार्दुंगला’ १७९८२ फूटची चढण! ८४ किलोमीटरच्या या खडतर आणि उंचावरील रस्त्यावर सायकलचे प्रत्येक पेडल मारताना कमालीची जिद्द लागते. जेव्हा सायकल जगातील सर्वोच्च मोटरेबल रस्त्यांपैकी एकावर म्हणजेच खार्दुंगला टॉपवर उभी राहते, तेव्हा तो क्षण आम्हा सायकलस्वाराच्या आयुष्यातील सर्वात सुवर्णक्षण ठरला.
सायकलवरुन केलेला हा प्रवास सोपा नक्कीच नाही. इथे पाय थकतात, श्वास फुलतो आणि हवामान सतत परीक्षा घेते. पण जेव्हा तुम्ही गाडीच्या इंजिनाशिवाय, केवळ स्वतःच्या ताकदीवर हिमालयाची ही अथांग शिखरे पार करता, तेव्हा तुम्ही फक्त अंतर पार करत नाही, तर स्वतःमधील एका नवीन आणि धाडसी व्यक्तीचा शोध घेता. ही थरारक सायकल मोहीम पूर्ण केल्याबद्दल शरद भुवड आणि टीमचे कौतुक होत आहे.
दापोली सायकलिंग क्लबचे शरद भुवड यांचा मनाली ते झांस्कर लेह लडाख सायकल प्रवास सुखरुप पूर्ण
Leave a Comment




