निवडणुकीच्या गाड्यांचे भाडे सहा महिन्यांनंतरही रखडल्याने दापोलीत चालकांवर उपासमारीची वेळ

Gramin Varta
64 Views

दापोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाला गाड्या भाड्याने देणाऱ्या दापोलीतील वाहन चालक-मालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, गेल्या सहा महिन्यांपासून फेऱ्या मारूनही भाड्याची देयके न मिळाल्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. याप्रकरणी संतप्त वाहन चालक-मालकांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी पाच ते सात फेब्रुवारी या कालावधीत तालुक्यातील अनेक वाहन मालकांनी आपल्या गाड्या प्रशासनाच्या निवडणूक कामासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.

मात्र, निवडणूक प्रक्रिया संपून सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप चालकांना त्यांच्या गाड्यांचे भाडे मिळालेले नाही. निवडणुकीच्या काळात गाड्यांचा खर्च, इंधन आणि इतर व्यवस्था करण्यासाठी चालकांना नातेवाईकांकडून उसनवारी किंवा कर्ज काढावे लागले होते. आता भाड्याचे पैसे न मिळाल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न या चालकांसमोर निर्माण झाला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही केवळ चालकांची हेळसांड होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या दुर्लक्षाबद्दल वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, तातडीने थकीत भाडे अदा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4656131
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *