दापोलीत विजेच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून दोन गाभण गाईंचा मृत्यू

Gramin Varta
167 Views

दापोली : तालुक्यातील मौजे पिसई येथील स्मशानभूमी परिसरात विजेच्या खांबावरील तुटलेल्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून दोन गाभण गाईंचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोरे कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

पिसई गावातील रहिवासी नारायण भिकू मोरे हे आपली गुरे स्मशानभूमी परिसरात चरावयास घेऊन गेले होते. त्यावेळी परिसरातील तीन-फेज वीजवाहिनीतील क्रमांक एकची विद्युतवाहिनी तुटून जमिनीवर पडलेली होती. चरत पुढे गेलेल्या दोन्ही गाभण गाईंना या तुटलेल्या विद्युतवाहिनीचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाई मोठमोठ्याने ओरडत असल्याचे लक्षात येताच नारायण मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना वीजवाहिनी खाली पडलेली दिसली. सुदैवाने त्यांनी गाईंना स्पर्श केला नाही आणि तत्काळ ही माहिती स्थानिक नागरिकांना दिली. त्यानंतर अजित एसरे यांनी त्वरित डीपीवरील फ्यूज काढून वीजपुरवठा बंद केला, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

मृत झालेल्या दोन्ही गाई जर्सी हायब्रीड क्रॉस जातीच्या आणि गाभण होत्या. त्यांची अंदाजे किंमत सुमारे ऐंशी हजार रुपये इतकी होती. घटनेची माहिती मिळताच पिसईचे पोलीस पाटील, सरपंच, महावितरणचे वायरमन व संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला. यानंतर तलाठ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृत जनावरे मालकांच्या ताब्यात देण्यात आली. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असून, तुटलेल्या वीजवाहिन्यांची वेळेवर दुरुस्ती करून अशा दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4598440
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *