ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

Gramin Varta
102 Views

पुणे: ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे आज (दि. २४) पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. जन्माने ज्यू धर्मीय, विवाहानंतर मुस्लिम कुटुंब स्वीकारलेल्या आणि एक नामांकित व्याकरणतज्ज्ञ अशी त्यांची ओळख होती.

त्यांच्या पार्थिवावर बाणेर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. बोली भाषा कशीही असली तरी लिखाण करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, अशी त्यांची आग्रही भूमिका होती.

यास्‍मिन यांचा जन्‍म ज्‍यू कुटुंबातील. त्‍यांचे मूळ नाव जेरुषा रुबेन असे होते. १९५० मध्‍ये त्‍यांचा अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्‍याशी विवाह झाला होता. त्‍यांनी आपला धर्म बदलला नाही मात्र जेरुषा रुबेन हे नाव बदलत यास्‍मिन शेख झाल्‍या, अशी आठवण त्‍यांनी एका मुलाखतीमध्‍ये सांगितली होती. यास्‍मिन शेख यांच्‍या पश्‍चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.

यास्मिन शेख या प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयात तब्बल ३४ वर्षे अध्यापन केले. तसेच मुंबईच्या शीव येथील एस. आय. ई. एस. महाविद्यालयात सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी आपले जीवन वाहून घेतले. त्यांनी शासनाच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’मध्ये आयएएसच्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्राचे दहा वर्षे अध्यापन केले. “भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे; तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे,” याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली.

यास्मिन शेख यांनी बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यात्मक व्याकरणा’च्या पुस्तकनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. राज्य शासनाच्या वतीने डॉ. अशोक केळकर सन्मान त्यांना प्रदान5 करण्यात आला होता.

मराठी माणसं इतरांशी बोलताना परकीय शब्‍दांचा वापर अत्‍यंत सहजपणे करतात. या वर्तनामुळेच आपण आपली भाषा प्रदूषित करत आहोत, याचे सर्वांनी भाव ठेवायला हवे. बोली भाषा कोणतीही असो कोणत्‍याही स्‍वरुपाचे लेखन करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे,’ अशी त्‍यांची आग्रही भूमिका यास्मिन शेख यांनी सातत्‍याने मांडली.

Total Visitors :
4754737
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *