मुंबई : वाहनचालकांच्या खिशाला आणखी एक झटका बसणार आहे. राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषणाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात राज्य सरकारने वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने १७ ऑगस्ट रोजी याबाबत परिपत्रक जारी केले असून, आता राज्यातील पीयूसी केंद्र चालकांना सुधारित दरानुसार शुल्क आकारावे लागणार आहे.
नव्या दरांनुसार दुचाकी वाहनांच्या पीयूसी तपासणी शुल्कात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकीसाठी असलेले ५० रुपयांचे शुल्क आता ६० रुपये झाले आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांसाठी १०० रुपयांऐवजी १२० रुपये आकारले जाणार आहेत.
तसेच पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांच्या पीयूसी तपासणीसाठी १२५ रुपयांऐवजी आता १४० रुपये द्यावे लागतील. सर्वाधिक वाढ डिझेल वाहनांच्या शुल्कात झाली असून, १४० रुपयांवरून हे शुल्क थेट १८० रुपये करण्यात आले आहे.
वाहनांच्या पीयूसीसाठी आता किती पैसे मोजावे लागणार?

दरवाढीमागे नेमकं कारण काय?
महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनने पीयूसी तपासणी शुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यातील तसेच इतर राज्यांमधील पीयूसी शुल्काचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. समितीने विविध बाबींचा अभ्यास करून अहवाल सादल्यानंतर शुल्कवाढीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला.
दरम्यान, पीयूसी केंद्र चालकांच्या संघटनेविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान परिवहन विभागाला आदेश प्राप्त झाल्यापासून चार महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुधारित शुल्कास मंजुरी दिली आहे.
जादा पैसे घेतले तर कारवाईचा इशारा
नव्या शुल्काची माहिती सर्व पीयूसी केंद्र चालकांना देण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत. तसेच प्रत्येक वायुप्रदूषण तपासणी केंद्राच्या दर्शनी भागात सुधारित शुल्काचा फलक ठळकपणे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्याचे आढळल्यास संबंधित पीयूसी केंद्र चालकाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पीयूसीसाठी पैसे भरताना केंद्रावर लावण्यात आलेला अधिकृत शुल्क फलक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे, या दरवाढीत डिझेल वाहनांना सर्वाधिक झटका बसला आहे. डिझेल वाहनांच्या पीयूसी शुल्कात तब्बल ४० रुपयांची वाढ झाली असून, आता त्यासाठी १८० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या दृष्टीने नव्या पीयूसी दरांची माहिती जाणून घेणे आवश्यक झाले आहे.





